सिल्लोड येथील पंचायत समिती कार्यालयात चर्चा
सिल्लोड, (प्रतिनिधी) : शेतकऱ्यांच्या हितासाठी तसेच शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी व शेतकरी आर्थिक दृष्ट्या बळकट व्हावा या उदात्त हेतूने तालुका कृषी अधिकारी कार्यालय व कृषी विभाग पंचायत समिती सिल्लोड यांच्या संयुक्त विद्यमाने रासायनिक खते, बी बियाणे, कीटकनाशके विक्रेते यांचे खरीप हंगाम पूर्व तालुकास्तरीय नियोजन बैठक सन २०२६-२७ आयोजित करण्यात आली.
यावेळी जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक छत्रपती संभाजीनगर हरिभाऊ कातोरे, तालुका कृषी अधिकारी डॉ. संदीप जगताप व तालुका गुण नियंत्रण निरीक्षक गजानन कुडके यांनी उपस्थित विक्रेत्यांना परवान्यानुसार लायसन्स उपलब्ध असावी, वेळोवेळी लायसन्स रिन्यूअल करणे, स्टॉक रजिस्टर मेंटेन ठेवणे, जेवढे परवाने तेवढे रजिस्टर अद्यावत करून ठेवावी, शेतकऱ्यांना पक्के बिल द्यावी.
शेतकऱ्यांना खत बियाणे व कीटकनाशके देताना त्याचे आधार कार्ड सातबारा, एकूण जमिनीचा दाखला बघूनच इपॉस मशीनद्वारे नोंद घेऊन माल वितरित करावा जेणेकरून तालुक्यातील शेतकऱ्यांना अडचण येणार नाही, बोगस बी बियाणे खते यांना प्रोत्साहन देऊ नये, ब्लॅक मार्केटिंग करू नये तसेच एक्सपायर झालेली उत्पादने विकू नये,
वेळेवर माल विक्री करावा, सीजन काळात शेतकऱ्यांना अडचण होऊ नये म्हणून शनिवार देखील दुकाने उघडी ठेवावी, शेतकऱ्यांच्या उत्पन्नात जास्तीत जास्त वाढ कशी होईल यादृष्टीने पावले उचलावी व शेतकरी अडचणीत येणार नाही. या दृष्टीकोनातून नियोजन करावे अशा सूचना देण्यात आल्या.
यावेळी जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, छत्रपती संभाजीनगर हरिभाऊ कातोरे, तालुका कृषी अधिकारी सिल्लोड डॉ. संदीप जगताप, गुण नियंत्रण अधिकारी सिल्लोड गजानन कुडके, कृषी अधिकारी पंचायत समिती सिल्लोड सुनील सूर्यवंशी, सिल्लोड तालुका कृषी निविष्ठा विक्रेता संघ अध्यक्ष नरेंद्र बापू पाटील, असोसिएशनचे उपाध्यक्ष राजेंद्र पाटील महाजन, असोसिएशन सचिव शंकर शेठ अग्रवाल, कार्यअध्यक्ष संतोष गव्हाणे, असोसिएन सल्लागार मधुकर मिरगे, स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) तालुका समन्वयक पंचायत समिती सिल्लोड केशवकांत बुलबुले व सिल्लोड तालुक्यातील रासायनिक खते बियाणे कीटकनाशके विक्रेते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.
तसेच सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसीम पटेल यांनी केले तर प्रस्तावना कृषी अधिकारी पंचायत समिती सिल्लोड सुनील सूर्यवंशी यांनी केली.















